कोड डिकोडेड.

एका प्रतिथयश लेखकाच्या दिग्दर्शनातील पदर्पणाच्या चित्रपटात मी सहदिग्दर्शक म्हणून रुजू झालो. मोठा अवलिया माणूस, 32 व्या वर्षी इतकं यश मिळूनही जमिनीवर. हो पण खूपच इन्ट्रोव्हर्ट. स्वतःच्या पर्सनल आयुष्याबद्दल कुणालाही भणक लागू न देणारा, अगदी मुरलेल्या पापाराझिंना ही नाही. त्यादिवशी रात्री दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मुहूर्ताच्या शॉट ची तयारी आटोपली आणि निवांत बसलो, सर ही होते, रादर आम्ही दोघेच होतो ऑफिस मध्ये. सरांनी लॅपटॉप बंद केला आणि आम्हा दोघांसाठी कॉफी घेऊन आले, शेजारीच बसले. त्यांच्याकडून अवांतर गप्पा सुरु होणं शक्यच नव्हतं, म्हणून मग मीच विषय काढला, “  सर, इतक्या लहान वयात इतकं यश मिळवलत, पण तुमच्या कामाशिवाय इतर गोष्टी कुणालाचाच माहीत नाहीत, अस का?” सर लगेच उत्तरले, “कारण पर्सनल लाईफ पर्सनल असतं आणि प्रोफेशनल लाईफ प्रोफेशनल. इतकंच” त्यांच्या या चपखल उत्तराने मला काही वेळ शांत केलं पण मी पुन्हा विचारलं, “ माझ्यासारख्या अस्पायरिंग दिग्दर्शकाला तुमच्या कडून बरच काही शिकायला मिळेल सर,” हे ऐकताच हलकस हसले, कदाचित माझ्या या वाक्यातली मेख समजली असावी त्यांना. म्हणाले, “खूप साध्या आणि निरागस मध्यमवर्गी घरातून आलो रे मी. पण तसं जरी असल तरी माझ्यावर कधीच कोणत्या अपेक्षा लादल्या गेल्या नाहीत. उलट माझ्या छोट्या छोट्या लिखाणाला प्रोत्साहन मिळत गेलं. मी लिहिण्याला सुरुवात करण्या आधी भरपूर वाचायला लावलं माझ्या वडिलांनी, आमच्या घरात तेव्हाही फर्निचर पेक्षा पुस्तक जास्त होती आणि आजही आहेत. पुढे कॉलेज मध्ये लिहू लागलो, माझ्या एकांकिका गाजू लागल्या, मग व्यावसायिक नाटकं मिळाली ती ही निसर्गाच्या कृपेने गाजली आणि मग चित्रपट मिळाले आणि त्यांच्याही बाबतीत तेच.” मी त्यांना मधेच तोडलं, “सर कॉलेज मध्ये तुमचं नाव झालेलं, मग एखाद अफेअर?” सर लगेच उत्तरले, “ होत ना, आणि ते ही हायप्रोफाईल अफेअर. माया तालमींना येऊन बसायची, फक्त बसायची. नन्तर समजलं की ती माझ्याकडे पाहत बसायची. मग नन्तर मीच धीर धरून बांधून एकवटला आणि विचारलं तिला लग्न करशील का?, ती पटकन हो सुद्धा म्हणाली. मग काय कॉलेजभर लोण पसरायला वेळ लागलाच नाही. तिने खूप खम्बिर राहून मला साथ दिली. अगदी  “ तो लेखक असला तरी मी त्याच्याशीच लग्न करेन, आणि आमचं आयुष्य पुढे कस असावं यासाठी आम्ही प्रयत्न करू,त्याची चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही.” अस माझ्यासाठी स्वतःच्या घरातल्यांना ठणकावून सांगणारी माया पाहून मी पुन्हा प्रेमात पडलो तिच्या, आणि मग लग्न केलं. पण लग्नाला 3 वर्षे उलटली तरी आम्हाला मुलबाळ नव्हतं, सतत रडायची ती आणि मी स्वतःला सावरून तिला धीर द्यायचो की बघ इतर जोडप्यांसारखं मुलांच्या जबाबदाऱ्या नाहीय आपल्याला, आयुष्यभर रोमान्स करायला मिळेल. हे माझं वाक्य ऐकून तेव्हढ्यापुरत हसायची मग पुन्हा तेच. मी ही सतत तिच्या गोष्टींमध्ये आणि मी माझ्या लिखानाच्या कामात, एकटेपण तिला खायला उठायचं. पण अचानक एक दिवस आमच्या आयुष्यात सुखद वाऱ्याची झुळूक आली, शेजारी एक गोंडस 2 वर्षांची परी राहायला आली तिच्या आजी आजोबांसोबत. तिचे आईबाबा ती 6 महिन्यांची असताना ऍक्सिडंन्ट मध्ये गेलेले,त्यानंतर ते जोडपं आमच्या शेजारी रहायला आलं. गोड होती ती खूप, सकाळी मी दारात कुंड्यांना पाणी द्यायला जायचो आणि रोज ते ताजतवान फुल नजरेस पडायचं, चेहऱ्यावर हजार सुसाईड करणाऱ्या माणसांना जगायला भाग पाडेल इतकी फ्रेश स्माईल असायची तिची, लवकरच ते म्हातार दाम्पत्य आमच्यात मिसळलं आणि माझ्या माया  मातृत्व मिळालं. आत्ता ती जगातली सर्वात समाधानी स्त्री होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक एक दिवस त्या आजी गेल्या. मी परगावी शूट साठी होतो, पण माया  होती तिथे, त्या दाम्पत्याच्या मोठ्या मुलाने सर्व संस्कार उरकले आणि महागाई च कारण देऊन त्या दोघा जीवांना स्वतःकडे ठेवण्याची जवाबदारी झटकली. आणि हे सर्व त्याच दिवशी घडलं, मला माया  ने ताबडतोब बोलवून घेतलं, मी आलोही. खूप धाय मोकलून रडली माझी बायको त्या छोट्या जिवाच्या चिंतेत. मला ही काय बोलावं ते सुचत नव्हतं. पुढचे काही दिवस खूप निराशेत गेले, त्या आजोबांचे ही आणि आमचेही, पण त्या परि च्या चेहऱ्यावरचं हसू अजूनही तसच होतं, सर्व काही ठीक होईल हा धीर देणारं.” मी न राहावता पुन्हा सरांना अर्ध्यावर तोडत विचारलं, “मग सर दत्तक घेतल का तुम्ही त्या चिमुरडीला?” सरांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले. “छे, तिनं आमच्या आयुष्यात मुलीची जागा कधीच घेतली होती, आणि त्यासाठी कोणत्या लीगल सोपस्कारांचीही गरज नव्हती, आम्ही दोघांनी तिच्या आजोबांना दत्तक घेतलं, ती गरज होती त्यांची, त्यावेळेला. आणि आम्ही त्यांच्या नातीच्या आईवडिलांच कर्तव्य पार पाडलं.” सरांच्या ह्या उत्तरांनंतर मी काही बोलण्याइतपत उरलोच नव्हतो. आणि ते तसेच खूप शांत,त्यांनी पुन्हा एकदा मला कॉफी साठी विचारलं.

विवेक.